महाराष्ट्रात १८ ते २० मार्च या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता...

राज्यात उन्हाच्या चटक्यांसह पूर्वमोसमी पावसाचा हंगामही सुरू झाला असून, गुरुवारपासून (१८ मार्च) तीन दिवस मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. कोकणातही काही ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मध्य महाराष्ट्रात नाशिक, जळगाव आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी, मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीड जिल्ह्यात, विदर्भात नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया  जिल्ह्यात अंदाज आहे. कोकणातील रत्नागिरी आणि रायगड येथेही काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

विदर्भात १७ मार्चलाही काही ठिकाणी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मार्च ते मे हा कालावधी पूर्वमोसमी पावसाचा असतो. या काळात उष्णतेसह समुद्रातून बाष्प येऊन कमी दाबाचे पट्टे तयार होत असतात. त्यानुसार नुकताच केरळ ते मध्य महाराष्ट्रापर्यंत कमी दाबाचा पट्टा होता. तो सध्या विरून गेला आहे. मात्र पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांत पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातही १८ ते २० मार्च या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

तापमान सरासरीपेक्षा अधिकच

राज्यात सध्या सर्वत्र दिवसाचे कमाल तापमान सरासरीपुढेच आहे. मुंबई परिसरात ३५.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान असून, ते सरासरीच्या तुलनेत २.५ अंशांनी अधिक आहे. पुणे, सोलापूर, सांगली, औरंगाबाद, बीड आदी भागांत ३६ ते ३७, तर नांदेड, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, बुलढाणा आदी भागांत कमाल तापमान ३८ ते ३९ अंशांवर आहे. एक-दोन दिवसांत त्यात किंचित घट होण्याची शक्यता आहे.

टिप्पणियाँ